Skip to content

डाँ. ज्योती जोशी

Home » गुरु परिवर्तन – कन्या रास

गुरु परिवर्तन – कन्या रास

कौटुंबिक संघर्षाची स्थिती
मात्र आर्थिक लाभाची प्राप्ती

ग्रह हे सतत भ्रमण करीत असतात. त्यांच्या गोचरचा विविध राशींवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे वेगवेळी आपण त्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण तुमच्यासाठी उपलब्ध करुन देत असतो. दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी गुरु परिवर्तन घडून येणार आहे. म्हणजे गुरु महाराज मकर राशीतून कुंभ राशीत गोचरने प्रवेश करणार आहेत. त्यांचं हे गोचर कन्या राशीच्या जातकांसाठी कसं राहिल? यावर आपण आजच्या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण गुरु महाराजाचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्वप्रथम आपण गुरु महाराज व त्यांच्या या गोचरचं महत्त्व समजून घेऊया. गुरु म्हणजे दाता, गुरु म्हणजे देणारा, गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे स्थैर्य होय. मानवी आयुष्यात ज्या ज्या गोष्टीला महत्त्व आहे, त्या प्रत्येक गोष्टीचं कारकत्व गुरु महाराजांकडे आहे. परित्रिकेतील गुरु महाराजांची स्थिती, त्यांची शुभता-अशुभता याचा खूप मोठा प्रभाव मनुष्य जीवनावर पडत असतो. एखादं बाळ जन्माला येतं म्हणजे संततीचं कारकत्व गुरुकडे, शिक्षणाचं कारकत्व गुरुंकडे, शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यक्ती अर्थार्जन सुरु करतो त्याचं कारकत्व गुरुकडे, त्यानंतर विवाहाचं कारकत्व गुरुकडे, भाग्याचं कारकत्व गुरुकडे आहे. निसर्ग कुंडलीतील दोन, पाच, नऊ, अकरा या अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानांचं कारकत्व गुरु महाराजांकडे असतं. म्हणून गुरु हा पत्रिकेतील अत्यंत महत्वपूर्ण ग्रह ठरतो.
एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती समृद्ध जाणारं? तो आपल्या आयुष्यात किती यशस्वी होणार? तो उच्च अभिरुचीपूर्ण आयुष्य जगणार की चुकीच्या वाटेने मार्गक्रमण करणार? तो अत्यंत श्रीमंतीत आयुष्य जगणार की गरीबीत दिवस काढणार? उच्चशिक्षण घेणार की शिक्षण न घेताच इतर कार्य करीत राहणार? या सर्व गोष्टी ठरविणारा ग्रह म्हणजे गुरु होय. मूळ पत्रिकेत गुरु महाराज जर योग्य स्थानी, योग्य राशीत, योग्य अंशात असले, नवमांशात त्यांची स्थिती योग्य असली तर त्या जातकाचं आयुष्य समृद्ध आणि संपन्न होतं. तसेच आपण असंही सांगू शकतो की एखाद्या माणसाचं यश मोजायचं असेल तर मूळ पत्रिकेतील गुरुची स्थिती बघावी. मूळ पत्रिकेतील गुरु महाराजांची स्थिती जितकी महत्त्वाची ठरते तितकीच त्यांची गोचरची स्थिती देखील महत्त्वाची ठरते. मूळ पत्रिकेतील स्थितीचा जितका परिणाम होतो, तितकाच गोचरच्या स्थितीचाही परिणाम हा तिव्र असतो.
आनंदाची बाब म्हणजे आता ते निसर्ग कुंडलीच्या लाभ स्थानात जाणार आहेत. लाभ हे इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. त्या स्थानाला गुरु महाराजांचं नैसर्गिक स्वामीत्व देखील लाभलेलं आहे. लाभ स्थान हे प्रत्येक गोष्टीत वाढ दर्शवितं. कौटुंबिक वाढ, एखादी इच्छापूर्ती होणं, आर्थिक लाभ प्राप्त होणं अशा गोष्टी तेथून घडतात. त्यात गुरु महाराज हे लाभाचे कारक ग्रह आहेत. म्हणजे लाभाचा कारक ग्रह लाभ स्थानात आता जाणार आहे. जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल. ही विशेष शुभ बाब २० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी होणार आहे. गुरु महाराजांच्या या राशी परिवर्तनाचा कन्या राशीवर प्रभाव पडेल? हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज हे तुमच्या पत्रिकेत चतुर्थेश आणि सप्तमेश आहेत. अर्थात दोन केंद्र स्थानांचं स्वामीत्व त्यांना प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे ज्योतिष नियमांनुसार त्यांना केंद्राधिपती होण्याचा दोष लागत आहे. म्हणूनच कन्या राशीसाठी गुरु महाराज हे कारक ग्रह ठरत नाहीत. तरी देखील ते एक नैसर्गिक शुभ ग्रह आहेत. दाता म्हणजे देणारे, हा त्यांचा मूळ गुणधर्म आहे. शिवाय चतुर्थ आणि सप्तम या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानांचं स्वामीत्व त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांचे अत्यंत परिणाम तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होत असतात. पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरुन वास्तु, वाहन, जमीन, सुखशांती, मातृ सौख्य अशा विविध गोष्टी बघितल्या जातात. तर सप्तम स्थानावरुन वैवाहिक जोडीदार आणि व्यापार बघत असतो. गुरु महाराज राशि परिर्वतन करुन तुमच्या षष्ठ स्थानात आता प्रवेश करणार आहेत. सहावे असलेले गुरु महाराज अर्थत्रिकोणाच्या दुसर्‍या टप्प्यात येऊन थांबलेले आहेत. तेथून ते अर्थ त्रिकोण पूर्ण करतात. म्हणजे या काळात तुम्हाला आर्थिक धनलाभाची प्राप्ती नक्कीच होईल. ती वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकते किंवा तिचे स्वरुप वेगवेगळे राहु शकते. मात्र अर्थ त्रिकोणाच्या स्थानात आलेले गुरु महाराज हे अर्थ प्राप्ती नक्कीच करुन देतात.
गुरु महाराजांच्या या स्थितीचा कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता सप्तमेश सप्तमाच्या व्ययात ही स्थिती निर्माण होत आहे. तिचा परिणाम म्हणजे कुटुंबात विसंवाद निर्माण होणं, जोडीदाराचं असहकार्य अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यातून तुम्हाला वाटचाल करीत पुढे जायचं आहे. त्यातही वेळोवेळी पत्रिकेतील बुधाच्या स्थितीनुसार फरक पडेल. कारण बुध हा तुमचा राशी स्वामी आहे. जेव्हा बुध ग्रह कुंभेतील गुरुच्या लाभ योगात, नवपंचम योगात असेल तर मधला तेवढा काळ शांततेचा जाईल. मात्र बुध जेव्हा षडाष्टक योगात जाईल तेव्हा वादाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढेल. या सगळ्याचा परिणाम म्हणजे घरातील सुखशांती विस्कळीत होईल. किंबहूना मागील काळातही गुरु महाराज जेव्हा मकर राशीत होते तेव्हाही तुम्हाला अस्वस्थतेचा सामना करावा लागला. तोच प्रकार पुन्हा एकदा होणार आहे. म्हणून तुम्ही योग्य ती काळजी या कालखंडात घ्यायला हवी. पारिवारीक सुखशांती, पारिवारीक एकता टिकवून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे. तेच तुमच्यासाठी उपयोगी राहिल.
आपण आधीही बघितले आहे की गुरु महाराजांच्या दृष्टीला अमृत दृष्टी मानलं जातं. कारण ते जिथे विराजमान असतात त्यापेक्षा ज्या स्थानांवर त्यांनी दृष्टी पडते तेथील फळांमध्ये ते वृद्धी करतात. त्यानुसार षष्ठ स्थानातून गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या कर्म स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्म स्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावरील गुरु महाराजांच्या अमृततुल्य दृष्टीचा परिणाम म्हणजे कर्मात वृद्धी, कर्मात ज्ञानाने प्रगती प्रगती होईल. त्यापासून अत्यंत शुभ फळे देखील तुम्हाला प्राप्त होतील. त्यांचा तुम्ही सदुपयोग करायला हवा.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काही कन्या जातकांना परदेशात जाण्याची ओढ लागेल. परदेशात जाऊन व्यवसाय करावा किंवा शिक्षण घ्यावं, अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण होईल. त्यांनी त्या दृष्टीने आपले प्रयत्न वाढविल्यास त्यात ते यशस्वी देखील होतील. कारण गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या व्यय स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील व्यय स्थानावरुन परदेशगमनाचे योग आपण बघु शकतो. तसेच व्यय स्थान हे पत्रिकेतील द्वादश स्थान असल्यामुळे अचानक, अनपेक्षित खर्च, करावास योग, हॉस्पिटलचे खर्च, विदेश, विदेशातील प्रवास अशा बर्‍याच गोष्टी आपण या स्थानावरुन बघु शकतो. अशा स्थानावर सम असलेल्या ग्रहाच्या राशीतून गुरु महाराजांची दृष्टी पडत असल्यामुळे बर्‍यापैकी हॉस्पिटलच्या खर्चाचे योग नाकारता येणार नाहीत. त्यामुळे तशी मानसिकता देखील तुम्ही आधीच तयार करुन घ्यावी. जेणे करुन अनपेक्षितपणे समस्या उभी राहिल्यास तिचा तुम्ही धैर्याने सामना करु शकाल.
यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या द्वितीय स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे कुटुंब स्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावर पडणार्‍या गुरु महाराजांच्या दृष्टीमुळे कौटुंबिक ऐक्य विस्कळीत होण्यासारखे प्रकार होऊ शकतात. म्हणजे एकीकडे जोडीदारासोबत विसंवाद आणि दुसरीकडे कौटुंबिक ऐक्याच्या बाबतीत नकारात्मकता हा भाग गुरु महाराज या काळात निर्माण करणार आहेत. म्हणजे कन्या जातक कुठेतरी एकटे पडतील. जोडीदाराकडून, कुटुंबातील इतर सर्व सदस्यांकडून तुम्हाला योग्य ते सहकार्य प्राप्त होणार नाही. ऐरवी आई जी तुमच्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक कृतीला पाठिंबा देत असते, या काळात तेही तुम्हाला प्राप्त होणार नाही. असे असले तरी याची जास्त काळजी तुम्ही करु नये. तर योग्य ती काळजी तुम्ही घ्यावी. कारण ही परिस्थिती फक्त सहा महिन्यांसाठी असणार आहे. त्यानंतर म्हणजे १३ एप्रिल २०२२ रोजी गुरु महाराज तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील. तेव्हापासून या स्थितीत बदल व्हायला सुरुवात होईल.
एकंदरीत पाहता सहावा गुरु तुमच्यासाठी थोडा त्रासाचा जरी असला तरी तो त्रास काय कायम स्वरुपी नाही, ही बाब तुम्ही प्रकर्षाने लक्षात घ्यायला हवी. तसेही प्रत्येक स्थिती किंवा प्रत्येक कालखंड हा आपल्यासाठी शुभच असेल, ही अपेक्षाही करणे बरोबर नाही. म्हणून या काळात तुम्ही धैर्याने, संयमाने वाटचाल करायला हवी. शिवाय गुरु महाराज सम राशीत असल्यामुळे त्यांचे काही शुभ परिणाम देखील निश्चितच आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे सहाव्या स्थानात आलेले गुरु महाराज हे अर्थ त्रिकोण पूर्ण करीत असतात. त्यामुळे कौटुंबिक विसंवाद, काही खर्च हे जरी होणार असले तरी या सहा महिन्याच्या काळानंतर जेव्हा तुम्ही तुमचं अकाऊंट बघाल तेव्हा मूळ बचतीमध्ये वाढ झालेली तुम्हाला आढळून येईल. कारण अर्थ त्रिकोणाच्या स्थानात आलेले गुरु महाराज हे आर्थिक लाभ तुम्हाला नक्कीच मिळवून देतील. त्याचा जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यावा. धन्यवाद! शुभम भवतु!
एस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी
९८५००९८६८८