Skip to content

डाँ. ज्योती जोशी

Home » गुरु परिवर्तन – कुंभ रास

गुरु परिवर्तन – कुंभ रास

भाग्यासह लाभात प्रचंड वृद्धी
व्यक्तिमत्त्वासह कुटुंबात समृद्धी

ग्रह हे सतत भ्रमण करीत असतात. त्यांच्या गोचरचा विविध राशींवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे वेगवेळी आपण त्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण तुमच्यासाठी उपलब्ध करुन देत असतो. दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी गुरु परिवर्तन घडून येणार आहे. म्हणजे गुरु महाराज मकर राशीतून कुंभ राशीत गोचरने प्रवेश करणार आहेत. त्यांचं हे गोचर कुंभ राशीच्या जातकांसाठी कसं राहिल? यावर आपण आजच्या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण गुरु महाराजाचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्वप्रथम आपण गुरु महाराज व त्यांच्या या गोचरचं महत्त्व समजून घेऊया. एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती समृद्ध जाणारं? तो आपल्या आयुष्यात किती यशस्वी होणार? तो उच्च अभिरुचीपूर्ण आयुष्य जगणार की चुकीच्या वाटेने मार्गक्रमण करणार? तो अत्यंत श्रीमंतीत आयुष्य जगणार की गरीबीत दिवस काढणार? उच्चशिक्षण घेणार की शिक्षण न घेताच इतर कार्य करीत राहणार? या सर्व गोष्टी ठरविणारा ग्रह म्हणजे गुरु होय. मूळ पत्रिकेत गुरु महाराज जर योग्य स्थानी, योग्य राशीत, योग्य अंशात असले, नवमांशात त्यांची स्थिती योग्य असली तर त्या जातकाचं आयुष्य समृद्ध आणि संपन्न होतं. तसेच आपण असंही सांगू शकतो की एखाद्या माणसाचं यश मोजायचं असेल तर मूळ पत्रिकेतील गुरुची स्थिती बघावी. मूळ पत्रिकेतील गुरु महाराजांची स्थिती जितकी महत्त्वाची ठरते तितकीच त्यांची गोचरची स्थिती देखील महत्त्वाची ठरते. मूळ पत्रिकेतील स्थितीचा जितका परिणाम होतो, तितकाच गोचरच्या स्थितीचाही परिणाम हा तिव्र असतो.
राशीचक्रातील धनु आणि मीन या दोन राशीचं स्वामीत्व त्यांच्याकडे आहे. धनु ही त्यांची अग्नीतत्त्वाची रास तर मीन ही त्यांची जलतत्त्वाची रास आहे. गुरु महाराजांचे मित्र ग्रह म्हणजे सूर्य, चंद्र व मंगळ होय. बुध आणि शुक्र हे त्यांचे शत्रु ग्रह आहेत. शुक्र म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य तर गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती होय. त्यांच्यामुळे त्यांच्या एक नैसर्गिक शत्रुत्व येथे निर्माण होतं. शनि हा ग्रह मात्र त्यांचा सम ग्रह आहे. आता सम असणे म्हणजे काय असतं? तर ती वन वे मैत्री असते. अर्थात शनि गुरुला आपला मित्र मानतो तर गुरु शनिला शत्रु मानतो. त्यामुळे त्यांच्यात समत्वाचं नातं तयार होतं. त्यांच्यात फार मैत्रीही नसते आणि फार शत्रुत्वही नसतं. अशी सर्व परिस्थिती असतांना गुरु महाराज कर्क राशीत उच्चीचे होतात. तिथे ते ०५ अंशापर्यंत उच्चीचे होतात तर मकर राशीत ०५ अंशापर्यंत ते परम नीचीचे होतात. मकर ही त्यांची नीच रास आहे. आता ते २० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी राशी परिवर्तन करुन कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यानुसार गुरु महाराजांच्या या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीवर काय प्रभाव पडेल? हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराजांचं हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गेली काही महिने गुरु महाराज व तुमचे राशी स्वामी शनि महाराज हे दोन्हीही व्यय स्थानातून प्रवास करीत आहेत. कुंभ राशासाठी गुरु महाराजांकडे धन व लाभ स्थानाची जबाबदारी असते. म्हणजे ते तुमच्या द्वितीय आणि एकादश स्थानाचे स्वामी आहेत. त्यामुळे आर्थिक धनलाभ, कुटुंब वृद्धी, इच्छापूर्ती या सर्व अत्यंत गोष्टी गुरु महाराजांच्या अखत्यारीत येतात. मागील काही महिन्यापासून ते तुमच्या व्यय स्थानातून प्रवास करीत आहेत. तिथे मकर राशी येते. जी त्यांची नीच राशी आहे. अर्थातच त्याचा प्रचंड मोठा दुष्प्रभाव तुमच्यावर पडलेला आहे. कुटुंबात वादविवाद, आर्थिक विवंचना, खर्चाचे प्रमाण अधिक असणं या सर्व प्रश्नांचा सामना करीत तुमचा प्रवास सुरु आहे.
एकादश म्हणजे लाभ स्थान हे पत्रिकेतील अत्यंत महत्त्वाचं असतं. या स्थानाचं स्वामीत्व गुरु महाराजांकडे आहे. म्हणजे तुम्हाला कोणता लाभ व्हावा? तो कव्हा व्हावा? कोणत्या इच्छांची पूर्तता व्हावी? तुमच्या घरात संतती केव्हा यावी? तुमच्या कुटुंबाची वृद्धी केव्हा व्हावी? आर्थिक लाभाचं प्रमाण किती असावं? एखादं घर मिळावं का? वास्तु मिळावी का? वास्तु मिळावी का? या सर्व अत्यंत महत्त्वपूर्ण बाबींचा निर्णय गुरु महाराज करतात. सोबतच द्वितीय म्हणजे धन स्थानाचे ते स्वामी असल्यामुळे कुटुंब कसं असेल? कुटुंबातील माणसं कशी असतील? कौटुंबिक धन कसं असेल? तुमची वाणी कशी असेल? या गोष्टींचे निर्णय देखील गुरु महाराज घेत असतात. वास्तविक पाहता, कुंभ राशीसाठी गुरु महाराज हे कारक ग्रह नाहीत. तरीही धन व लाभ या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानांचं स्वामीत्व त्यांच्याकडे असल्यामुळे कुंभ राशीसाठी गुरु महाराजांची स्थिती, त्यांचं गोचर हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं.
असे हे गुरु महाराज मागील काही महिन्यांपासून तुमच्या व्यय स्थानातून प्रवास करीत आहेत. तिथेच तुमचे राशी स्वामी शनि महाराज देखील विराजमान आहेत. व्यय स्थान हे मूळत: एक नकारात्मक स्थान असतं. व्यय म्हणजे खर्च होय. मग हॉस्पिटलचे खर्च, अनपेक्षितपणे करावे लागणारे खर्च, प्रवास, परदेशगमन या सगळ्या गोष्टी आपण व्यय स्थानावरुन पाहतो. यातील परदेशगमनाला आज काळानुसार शुभ मानण्यात येत असलं तरी जेव्हा आपण द्वादश स्थान म्हणतो तेव्हा ते मूळत: नकारात्मक स्थान असतं. म्हणजे साध्या, सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास निसर्गाने ज्याप्रकारे सगळीकडे इनपूट – आऊटपूट ठेवलेलं असतं, त्याप्रकारे पत्रिकेतील द्वादश स्थान हे आऊटपूटचं स्थान असतं. त्याला आपण आध्यात्म्याचं, मोक्षाचं स्थान देखील आध्यात्मिक प्रगती देखील आपण तेथूनच पाहतो. तर अशा या स्थानात गुरु महाराजांचे नकारात्मक परिणाम तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात सहन केले. आता मात्र ही परिस्थिती बदलणार आहे. कारण गुरु महाराज राशी परिवर्तन करुन तुमच्या राशीत म्हणजे प्रथम स्थानात येणार आहेत.
ज्योतिष नियमांनुसार पहिला गुरु हा खूप शुभदायक असतो. कारण येथून त्यांची शुभ दृष्टी पंचम, सप्तम आणि भाग्य या तीन महत्त्वपूर्ण स्थानांवर पडते. गुरु महाराज ज्या स्थानात विराजमान असतात त्यापेक्षा ते ज्या स्थानांवर त्यांची दृष्टी पडते त्या स्थानांच्या फळांमध्ये ते वृद्धी करीत असतात. कारण त्यांच्या दृष्टीला अमृततुल्य मानली जाते. त्यामुळे गुरु महाराजांची ही अमृत दृष्टी तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. तुमचे राशी स्वामी अजूनही व्यय स्थानातच विराजमान आहेत. अशा परिस्थिती धनेश आणि लाभेश असलेले गुरु महाराज तुमच्या राशीत येणार आहेत. ज्यामुळे एक विसावा देणारी सावली तुम्हाला प्राप्त होऊ होईल. म्हणजे मागील काही महिन्यांपासून तुम्ही जो संघर्ष करीत आहात तो कुठे तरी कमी व्हायला सुरुवात होईल. म्हणूनच गुरु महाराजांचं हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
प्रथम स्थानातून गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील पंचम स्थानावरुन शिक्षण, संतती, प्रणय या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो. त्यानुसार या सगळ्यांच्या बाबतीत तुम्हाला अत्यंत शुभ फळे प्राप्त होतील. जे जातक शिक्षण घेत आहेत त्यांना फार मोठं शैक्षणिक या काळात प्राप्त होईल. अभ्यासात प्रगती घडून येईल. विशेषत: जे जातक अकाऊंट, मॅनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात शिक्षण घेत आहेत, त्यांना मोठं यश या काळात प्राप्त होऊ शकतं. संतती जी मागील महिने तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत होती, आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीत होती ती थोडंसं तुमचं ऐकायला लागेल. म्हणजे तुमचं म्हणणं त्यांना पटायला लागेल. इष्टदेवांचे आशीर्वाद तुम्हाला भररुन प्राप्त होतील. जोडीदाराशी सुसंवाद वाढेल. कारण गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडत आहे. पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावर पडणार्‍या गुरु महाराजांच्या अमृत दृष्टीमुळे तुमच्या दोघांच्या म्हणण्यात कुठेतरी एकवाक्यता निर्माण होईल. ही बाब तुमच्यासाठी नक्कीच खूप महत्त्वपूर्ण व लाभदायक आहे. कारण मागील काही दिवसांपासून तुमच्या वैवाहिक आयुष्यात कुठे ना कुठे संघर्षाची स्थिती निर्माण झाली हाती. जी आता निवळायला सुरुवात होईल.
कुंभ राशी ही बुद्धिमान लोकांची राशी म्हणून ओळखली जाते. मात्र मागील काही महिन्यांमध्ये तुम्हाला भाग्याकडून योग्य ते सहकार्य प्राप्त होत नव्हतं. ज्यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला प्रचंड संघर्षाचा सामना करावा लागत होता. तो करुनही यशाची खात्री मात्र मिळत नव्हती. गुरु महाराजांच्या राशी परिवर्तनामुळे या स्थितीतही खूप मोठा बदल घडून येईल. कारण प्रथम स्थानातून गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या भाग्य स्थानावर पडणार आहे. आतापर्यंत तुम्ही जे काही मिळवत होता ते स्वत:च्या बुद्धीने व परिश्रमाने मिळवित होता. येथून पुढे त्यात तुम्हाला भाग्याचीही साथ लाभेल. सोबतच कुटुंबाकडून योग्य ते सहकार्य प्राप्त होईल. वडीलांचेही सहकार्य व मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच मिळेल. किंबहूना वडीलांच्या मार्गदर्शनाने तुमची प्रगती घडून येईल.
एकंदरीत पाहता लाभ स्थान, धन स्थान, तुमची राशी, पंचम, सप्तम आणि भाग्य अशा सर्व महत्त्वपूर्ण स्थानांवर प्रभाव टाकणारे गुरु महाराज हे तुमच्यासाठी बर्‍यापैकी शुभ होणार आहेत. त्या शुभ परिणामांमुळे बर्‍याच बाबतीत तुमची प्रगती घडून येईल. जी मागील काही कालखंडात थांबलेली होती. मात्र तुमच्या राशी स्वामीचा प्रवास जोपर्यंत व्यय स्थानातून सुरु आहे तोपर्यंत ते तुम्हाला सातत्याने सांगत आहेत की तुम्ही तुमच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करु नका. कारण व्यय स्थानातून शनि महाराज हे तुमचे राशी स्वामी असून ते तुम्हाला सातत्याने कर्तव्यांची जाणीव करुन देत आहेत. ती कर्तव्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण त्यावर तुमचं यश हे बर्‍यापैकी अवलंबून राहिल.
जे जातक मागील काही दिवसांपासून घरात पाळणा हलण्याची वाट बघत असतील, त्यांची मनोकामना पूर्ण होईल. उपवर मुला-मुलींचे विवाह जुळून येतील. अर्थात, या गोष्टी सगळ्यांच्या बाबतीत घडतील का? तर तसं होत नसतं. ये योग जेव्हा आपण सांगतो तेव्हा एक विशिष्ट्य वय असायला हवं. मूळ पत्रिकेतील ग्रहस्थितीकडून त्याला पाठबळ मिळायला हवा. कारण गोचर म्हणजे मूळ पत्रिकेनुसार एखादी घटना घडणार असेल तर ती केव्हा घडेल? हे दाखविणारा काळ होय. अर्थात, मूळ पत्रिकेतील ग्रहस्थितीशिवाय एवढे शुभ परिणाम होऊ शकत नाही. त्यानुसार तुमच्या मूळ पत्रिकेत जर गुरु महाराजाचं स्थान, राशी, त्यांचे अंश उत्तम असतील तर या काळात तुम्हाला विविध दृष्टीने प्रचंड लाभ प्राप्त होऊ शकतो. हा कालावधी फक्त सहा महिन्यांचा जरी असला तरी लाभाच्या विविध संधी तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे. त्यांचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यावा.
धन्यवाद! शुभम भवतु!
एस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी
९८५००९८६८८